दूधाला 40 रुपये दर मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहणार- अजित नवले
- By - Team Agricola
- Jul 12,2024
दूधाच्या प्रश्नावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. दूधाला 40 रूपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी करत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आंदोलन देखील करत आहेत. दूध दराच्या संदर्भात 11 जूलै रोजी झालेली मंत्रालयस्तरीय तिसरी बैठक अपयशी ठरली आहे. याबबातची माहिती किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी दिली आहे.
अजित नवले म्हणालेत, जोपर्यंत दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहणार आहे. अनुदानाचा घोळ घालून शेतकऱ्यांना यापुढं अधिक काळ नादी लावता येणार नाही. निवडणुका संपल्या की अनुदान बंद होईल. अटी शर्तींच्या माध्यमातून अनेक दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित ठेवले जाईल. असे होऊ नये यासाठी अनुदान नको, घामाचे दाम द्या, उत्पादन खर्चावर आधारित सद्यस्थितीला किमान 40 रुपये प्रति लिटर दुधाला भाव द्या व हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पावले उचला ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची भूमिका बैठकीत ठामपणे मांडण्यात आल्याचे अजित नवले म्हणाले.