new-img

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी 20 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

ह्या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम सन 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील. खरीप पणन हंगाम सन 2023-24 मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम सन 2023-24 साठी धान, भरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.

धान खरेदीस मुदतवाढ -
खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.