new-img

अपडेट! कांद्याच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पुन्हा महाराष्ट्रात

नोव्हेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता पुन्हा एकदा केंद्राचे पथक मंगळवार (दि. 6) ते शुक्रवार (दि. 9) या कालावधीत महाराष्ट्रात कांद्याच्या पाहणीसाठी दौरा करत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या या पथकातर्फे राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यांचा दौरा केला जाणार आहे.

दौऱ्यात पथक रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन, लेट खरीप हंगामातील उत्पादन, प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याची आवक आणि सद्यस्थिती याची पाहणी करणार आहे. तसेच राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन पुढील नियोजनावर चर्चा करणार आहे. नाशिक, पुणे आणि बीड या कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये पथकाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. या दौऱ्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकार पुढील निर्णय घेणार आहे.