कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मापाडी वर्गाला बंतोष अँप चे ट्रेनिंग
- By -
- Oct 10,2023
अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेली कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आता हायटेक होण्याच्या मार्गावर आहे. बंतोष ॲपच्या मदतीने कोपरगाव बाजार समितीचे डिजिटलायझेशन होणार असून इथेही शेतमालाचे वजन, विक्री, व्यवहार आदी गोष्टी बंतोष ॲपच्या सहाय्याने ऑनलाईन पार पडणार आहेत. ह्याचीच पहिली सुरुवात म्हणून बाजार समितीमधील मापाडी वर्गाला बंतोष ॲपच्या वापराचे ट्रेनिंग देण्यात आले.
बुधवार (दिनांक 27 सप्टेंबर 2023) रोजी बाजार समितीच्या कार्यालयात बंतोषचे अधिकारी निलेश पाटील यांच्याकडून बंतोष प्रणालीच्या वापराचे ट्रेनिंग मापाडी वर्गाला देण्यात आले. बाजार समितीमधील सर्व मापाडी यावेळी कार्यशाळेला उपस्थित होते. तसेच बाजार समितीचे संचालक रामचंद्र साळुंके आणि रामदास केकाण हे प्रामुख्याने उपस्थित होते. यासह सचिव नानासाहेब रणशूर आणि बाजार समिती कर्मचारी वर्गही उपस्थित होते.
कोपरगाव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, सर्व संचालक मंडळ आणि सचिव नानासाहेब रणशूर यांनी बंतोष प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही अर्थात कोपरगाव बाजार समितीचे व्यवहार देखील बंतोष प्रणालीच्या सहाय्याने डिजिटल व्हावे ह्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आता लवकरच कोपरगाव बाजार समितीमध्ये प्रत्यक्षात बंतोष प्रणालीचा वापर सुरु होणार आहे.
बंतोष प्रणाली काय आहे?
बंतोष प्रणाली ही एक रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो. तर दुसरीकडे शेतकरी, मापाडी, खरेदीदार ह्यांना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवणे सोपे जाते. तसेच, वेळ, पैसा, मनुष्यबळ आदींची बचत होत असल्याने बाजार समित्यांकरिता बंतोष प्रणाली फायदेशीर आहे. बंतोषच्या मोबाईल ॲपमधून बाजार समितीचे व्यवहार डिजिटल होत असल्याने बाजार समित्यांकडून ह्या प्रणालीचा स्विकार होत आहे. मोबाईल ॲपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप आणि मेसेजवर मिळणारे अपडेट्स ह्यामुळे बंतोष ॲप अत्यंत प्रभावी ठरत आहे.